पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर एकूण १० एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. पहिल्या फेजमध्ये सुमारे दोन दशलक्ष लिटर पाणी आवश्यक असून, हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून विमानतळाला पाणी पुरवठा केला जाणार आहे.
पहिल्या फेजमध्ये क्षमता दहा लाख प्रवासी हाताळण्याची असून, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मालवाहतूकही कार्गो टर्मिनल्सवरून केली जाणार असून, ५ फेजमध्ये हा प्रकल्प पूर्ण होत असल्याने प्रवासी व मालवाहतुकीचे प्रमाण हळूहळू वाढेल. विमानतळासाठी वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांची आवश्यकता आहे.
पूर्ण क्षमतेसाठी ७५ मेगावॅट वीज लागणार आहे, एकूण १० एमएलडी पाणी आवश्यक आहे. सिडकोने हेटवणे धरणातील आरक्षित पाण्याचा वापर करून विमानतळाला सुरुवातीला दोन एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी स्वतंत्र जलकुंभ आणि पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
रेन वॉटर हार्वेस्टींग
विमानतळाच्या टर्मिनल्स बिल्डिंग, प्रशासकीय इमारत आणि मालवाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टीम बसवण्यात आहे. यामुळे पावसाचे पाणी साठवून ते आवश्यकतेनुसार वापरले जाईल, ज्यामुळे पाण्याची बचत होईल.
पाण्याचा पुनर्वापर
वमानतळ परिसरात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर गार्डन, झाडे आणि वॉशिंगसाठी केला जाईल. यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखता येईल आणि पाणीटंचाई निर्माण होणार नाही.