जेएनपीटी बंदरात २३ कोटींचा ई-कचरा जप्त ; सूरतमधील कंपनी संचालक अटकेत , डीआरआयची कारवाई

By Raigad Times    07-Oct-2025
Total Views |
 uran
 
उरण | जेएनपीए बंदरात विदेशातून बेकायदेशीर पद्धतीने चार कंटेनरमधून आयात करण्यात आलेल्या २३ कोटी रुपयांच्या ई- कचर्‍याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी जप्त केला आहे. या प्रकरणी सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
 
मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने संशयित चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली असता ‘अ‍ॅल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप’ म्हणून लपवून आयात केलेला ई-कचरा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये १७,७६० जुने आणि वापरलेले लॅपटॉप, ११,३४० मिनी/बेअरबोन सीपीयू, ७,१४० प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक यांचा समावेश आहे. डीआरआयच्या माहितीप्रमाणे, या मालाची एकूण किंमत सुमारे २३ कोटी रुपये इतकी आहे.
 
अटक केलेल्या आरोपीने तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठ्यात सक्रिय सहभाग घेतल्याचे डीआरआयच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, सरकारी धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून अशा प्रतिबंधित वस्तूंचा भंगार म्हणून योग्य रितीने निपटारा करणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकारच्या बेकायदेशीर तस्करीमुळे चिंतेची बाब निर्माण होत आहे.