एअरपोर्ट कर्मचार्‍यांसाठी वाधवा वाईजमध्ये निवास व्यवस्था , ४०५ फ्लॅट्स घेतले भाडे तत्वावर

By Raigad Times    07-Oct-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी होत असून डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वाधवा वाईज सिटी येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ४०५ फ्लॅट्स भाडेतत्त्वावर घेण्यात आले असून त्यासाठीचा करारनामा पूर्ण झाला आहे.
 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वास आले आहे. डिसेंबरपासून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. विमानतळावर सुमारे १५,००० रोजगारनिर्मिती झाली असून स्थानिकांना प्राधान्य दिले जात आहे. या ठिकाणी शेकडो तंत्रज्ञ व अनुभवी कर्मचारी काम करणार असून त्यांच्या निवासासाठी शेडुंगजवळील वाधवा वाईज सिटी हा पर्याय निश्चित करण्यात आला आहे.
 
डोंगरांच्या सानिध्यात व हिरवाईने नटलेल्या या टाउनशिपमध्ये दोनशेहून अधिक एकरांवर निवासी संकुल उभारलेले आहे. विमानतळ प्रभावक्षेत्रात येणार्‍या या प्रकल्पातील काही वर्षे एअरपोर्ट कर्मचारी तात्पुरते क्वार्टर्स म्हणून राहतील. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड लवकरच स्वतःचे निवासस्थान बांधणार आहे. तोपर्यंत कर्मचार्‍यांना व कुटुंबीयांना ‘लीज अँड लायसन्स’ करारावर वाधवा वाईज सिटीतील रेडी-टू-मूव्ह फ्लॅट्समध्ये राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. कंपनीतर्फे वाहतुकीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पनवेलचे रिअल इस्टेट हलले!
नवी मुंबई विमानतळ सुरू होण्यापूर्वीच पनवेल परिसरातील प्रॉपर्टी बाजारात मोठी हालचाल दिसत आहे. गेल्या काही वर्षांतील दरवाढीच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या उड्डाणांनंतर मागणी आणखी वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
भाडेतत्त्वावर ४०५ फ्लॅट्स
ऑक्टोबर २०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ‘द वाधवा ग्रुप’सोबत एमओयूवर स्वाक्षरी करत ४०५ रेडी-टू-मूव्ह-इन फ्लॅट्सचा ‘लीज अँड लायसन्स’ करार केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाडेतत्त्वावर फ्लॅट्स घेण्याचा हा नवी मुंबई परिसरातील पहिलाच व्यवहार ठरला आहे.