कर्जत | कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यांपासून चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी तब्बल अकरा लाख रुपयांच्या किमतीचे ४१ मोबाईल तक्रारदार मालकांना परत केले आहेत.
कर्जत परिसरात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी एक विशेष पथक तयार करून तपासाची जबाबदारी दिली होती. मार्च २०२५ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील चंद्रकांत माधव अनकाडे हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला.
चौकशीत त्याने कर्जत परिसरातून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत तब्बल ४१ मोबाईल जप्त केले. या मोबाईल फोनची बाजारातील किंमत सुमारे अकरा लाख रुपये इतकी आहे. या यशस्वी कारवाईबद्दल रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय शिवतारे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी कर्जत पोलिसांचे कौतुक केले आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, हवालदार स्वप्नील येरूनकर, समीर भोईर, प्रवीण भालेराव, केशव नागरगोजे व विठ्ठल घावस यांनी मोलाची भूमिका बजावली.