नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव , पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांना शब्द !

देवेंद्र फडणवीस यांचे सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त समितीला आश्वासन

By Raigad Times    05-Oct-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते नेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाणार आहे. या एकमेव नावाचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठविलेला असून, नामकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहमती दर्शवली आहे. मागील आठवड्यात त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे.
 
ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून विमानतळाला दि.बां.चेच नाव दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त समितीला आश्वासित केले.पनवेल परिसरात बांधण्यात आलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. त्यानुसार जोरदार तयारी सुरु आहे. त्यानंतर हा परिसर सीआयसीएफकडे वर्ग करण्यात येईल.
 
विमानतळाचे पूर्ण स्कॅनिंग करून मगच देशांतर्गत विमान सेवा सुरुवातीला चालू होईल. दरम्यान, जगातील सर्वात मोठ्या विमानतळापैकी एक असणार्‍या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. यासाठी विविध आंदोलनेही करण्यात आले. राज्य सरकारने यासंदर्भात ठराव संमत करून केंद्राकडे पाठवला.
 
परंतु विमानतळ टेकऑफ होत असताना नामकरण रखडल्यामुळे नवी मुंबई रायगड आणि ठाणे परिसरातील प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रम दिसून येत होता. जर विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव दिले नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ, अशी भूमिका जाहीरपणे प्रशांत ठाकूर यांनी घेतली होती. परंतु राज्य सरकारने विशेष करून मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार विमानतळाला एकच नावाचा प्रस्ताव असल्याचे स्पष्टीकरण दिले. मध्यंतरी भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी रॅली काढत विमानतळ नामाकरणाचा मुद्दा उपस्थित केला.
 
त्यानंतर विविध राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी खासदार म्हात्रे यांचे आंदोलनातील योगदान काय असा सवाल उपस्थित केला उद्घाटनाची तारीख जवळ येत असल्यामुळे सर्वपक्षीय प्रकल्पग्रस्त शिष्टमंडळाने शुक्रवारी (३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव दिले जाणार असल्याचा पुनरुच्चार केला. या विमानतळासाठी एकच नाव पाठषवण्यात आले आहे.
 
आम्ही विमानतळाला तेच नाव देणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाचा विषयदेखील होता. पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो अंतिम असेल. तसेच या संदर्भातील सर्व अधिकार राज्य सरकारकडे देण्यात येतील. या संदर्भातील ठराव मंजूर होऊन राज्याला तो अधिकार दिला जाईल.
 
त्या कामासाठी जो वेळ लागेल त्यानुसार येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करू असे त्यांनी समितीला आश्वासित केले. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार राजू पाटील, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, कॉम्रेड भूषण पाटील, संतोष केणे, नंदराज मुंगाजी, यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे, ही मागणी भूमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांची होती. दरम्यान ज्या लोकांचा आंदोलनाशी संबंध नाही ते या प्रकरणात संभ्रम पसरवत गेले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सरकारची भूमिका विषद करत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्याच्या आत विमानतळाचे नामकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. - प्रशांत ठाकूर, आमदार-पनवेल