ताम्हिणी घाटात दगड कोसळून महिलेचा मृत्यू , कारचे सनरुफ ठरले जीवघेणे

By Raigad Times    31-Oct-2025
Total Views |
 mangoa
 
ताम्हणी | माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात गुरुवारी (३० ऑक्टोबर) दुपारी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ घडली असून, कारच्या सनरुफवर दगड कोसळल्याने हा दुर्दैवी अपघात झाला.
 
पुण्याहून माणगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत असताना हा अपघात झाला. ताम्हिणी घाटातील डोंगरावरून अचानक दरड कोसळली आणि त्यातील मोठा दगड धावत्या कारच्या सनरुफवर पडला. दगडाच्या तीव्र धक्क्याने सनरुफ फुटले आणि तो दगड कारमध्ये बसलेल्या स्नेहल गुजराती (वय ४३) या महिलेच्या डोक्यावर आदळला. या घटनेत स्नेहल गुजराती गंभीर जखमी झाल्या.
 
अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या डोक्याला झालेली दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू असतानाच कारमध्येच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.