पनवेल | शहरात कॉर्पोरेट जगतातील काळं सत्य उघडकीस आले आहे. विमा कंपनीतील एक शाखा व्यवस्थापक महिला सहकार्याच्या घरी पाहुणचाराच्या बहाण्याने आला आणि तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घटली. मॅनेजरच्या पत्नीने या कृत्याचे चित्रीकरण करून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 
 
या प्रकरणाने संपूर्ण पनवेल परिसरासह व्यावसायिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव प्रदीप नामदेव नरळे (वय ३४, रा. पनवेल) असे असून तो अंधेरी येथील एका विमा कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होता. या गुन्ह्यात त्याची पत्नी रेणुका नरळे आणि भाऊ प्रविण नरळे हे देखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोघेही सध्या फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप नरळेची ओळख नागपूर शाखेत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय महिला सहकार्याशी कंपनीच्या ऑनलाइन मीटिंगदरम्यान झाली होती. सुरुवातीला कामानिमित्त झालेलं बोलणं पुढे वैयक्तिक नात्यात रूपांतरित झालं. त्यानंतर २७ मार्च रोजी कामानिमित्त मुंबईत आलेल्या महिलेला नरळेने पनवेल येथील घरी पाहुणचारासाठी बोलावलं. पाहुणचाराच्या बहाण्याने जेवणात गुंगी आणणारे औषध मिसळून महिलेला बेशुद्ध करण्यात आले. 
 
शुद्ध हरपल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल. या घटनेचं चित्रीकरण आरोपीची पत्नी रेणुका नरळे हिने स्वतः केलं, असे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. यानंतर या दाम्पत्याने तयार केलेल्या व्हिडिओचा वापर करून पीडितेला ब्लॅकमेल करण्यात आले आणि लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात आली.
 
 या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अखेर धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार नोंदवली.तक्रार मिळताच पोलिसांनी सापळा रचून प्रदीप नरळे याला अटक केली. या प्रकरणी आरोपींवर बलात्कार, खंडणी, गुन्हा करण्यासाठी कट, आणि आयटी अॅक्टअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पनवेल पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.