जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे अखेर निलंबित , अधिकारी, कर्मचारी यांच्या तक्रारींची दखल

By Raigad Times    31-Oct-2025
Total Views |
 alibag news
 
अलिबाग | रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. सादर करण्यात आलेल्या अहवालातील निरीक्षणांच्या आधारे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आली आहे.
 
शासनाचे कार्यासन अधिकारी प्रे. ज्ञा. सोनटक्के यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तत्काळ निलंबनाचे आदेश पारित केले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत डॉ. विखे निलंबित असणार आहेत. निलंबन आदेश अंमलात असेपर्यंत डॉ. विखे यांचे मुख्यालय उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे येथे निश्चित करण्यात आले आहे.
 
त्यांना सक्षम अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबनाच्या काळात त्या खाजगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगधंदा करू शकणार नाहीत. असे केल्यास ते गैरवर्तन मानले जाईल आणि त्या निर्वाहभत्ता मिळण्यास अपात्र ठरतील. निलंबन कालावधीत त्यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
काय आहे प्रकरण ?
डॉ. मनिषा विखे या रायगड जिल्हा परीषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची ठाणे येथे जिल्हा क्षयरोग अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. याविरोधात त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली.
 
डॉ. मनिषा विखे यांना पुन्हा रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रूजू करून घ्यावे असा निर्णय मॅटने दिला. दरम्यानच्या काळात डॉ. विखे यांच्या विरोधात आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारी होत्या. आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारयांच्या संघटनांनीदेखील त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यावर डॉ. विखे यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती.
एका निनावी पत्रावरून माझी चौकशी झाली. मात्र, मला चौकशी अहवाल दिला नाही किंवा माझे म्हणणे मांडण्याची नियमानुसार संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे हा निलंबन आदेश योग्य नाही. मी कोणताही गैरप्रकार वा गैरवर्तन केलेले नाही. त्यामुळे मी राज्याच्या आरोग्यमंत्री यांच्याकडे या निर्णयाविरुद्ध दाद मागणार आहे. - डॉ. मनिषा विखे, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी.