कर्जत | चुकीने बँक खात्यात जमा झालेली तब्बल ८० हजार रुपयांची रक्कम एका महिलेने कोणत्याही विलंबाशिवाय परत केली. नलिनी रघुनाथ कर्डीकर गायकवाड (रा. डिकसळ, कर्जत) या महिलेच्या या प्रामाणिक कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील बालकृष्ण देवराज पयाली यांनी आपल्या भाच्याच्या महाविद्यालयीन फी भरण्यासाठी ‘गुगल पे’द्वारे ८० हजार रुपये पाठवले होते.
मात्र, मोबाईल क्रमांक टाईप करताना एक अंक चुकीचा दाबला गेल्याने रक्कम चुकीच्या खात्यावर जमा झाली. पैसे न मिळाल्याचे लक्षात येताच पयाली यांनी तपास सुरु केला आणि ती रक्कम कर्जत तालुक्यातील नलिनी कर्डीकर यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे समजले.
यानंतर पयाली हे थेट कर्जत पोलीस ठाण्यात पोहोचले. चौकशीत ते खाते डिकसल गावातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रकरण नेरळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस शिपाई शरद लोहारे आणि भावना बेलोटे यांनी स्थानिक पोलीस पाटील सरिता शेळके व सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड यांच्या मदतीने नलिनी कर्डीकर यांच्याशी संपर्क साधला. नलिनी कर्डीकर यांनी तत्परतेने आपल्याला चुकीने आलेले पैसे खर्च न करता सुरक्षित ठेवले असल्याचे सांगितले आणि ८० हजार रुपयांची पूर्ण रक्कम पोलिसांच्या उपस्थितीत परत केली.