पनवेल | पनवेल परिसरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असताना बुधवारी दुपारी खारघरमधील रवेची हाईट्स या उंच इमारतीतील एका सदनिकेला लागलेल्या आगीने पुन्हा एकदा नागरिकांना धास्तावून सोडले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर ७ मधील भूखंड क्रमांक २५ वर असलेल्या रवेची हाईट्स या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील सदनिकेत ही आग लागली होती. स्थानिक रहिवाशांनी धूर दिसताच अग्निशमन दलाला तातडीने कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित कारवाई करून आग विझवली.
आगीचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या ११ महिन्यांत एकूण ३३५ आगीच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. तर सिडकोच्या अखत्यारीतील खारघर अग्निशमन केंद्रात १६० आगीच्या घटनांची नोंद झाली असून, यातून ४३ नागरिकांचे प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.