मुरुड-जंजिरा | प्रत्येक व्यक्तीकडे स्वाभिमान आहे. परंतु काही लोक आपली तत्त्वे लादण्यासाठी दुसर्यांवर जबरदस्ती करतात. मात्र मुरुड तालुका हा सुसंस्कृत असून या तालुक्यातील व्यक्ती अपमान सहन करु शकत नाहीत. त्यामुळे भाई सुर्वे यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश हा विरोधकांसाठी चपराक आहे असे सांगतानाच प्रत्येकाच्या दिव्याखाली अंधार आहे.
त्यामुळे आरोप करण्यापूर्वी विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. मुरुड तालुक्यातील प्रमुख नेते भाई सुर्वे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे खा.तटकरे यांनी पक्षात स्वागत केले. याप्रसंगी मुरुड तालुकाध्यक्ष फैरोज घलटे, प्रमुख नेते मनोज भगत, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडीक, माजी सरपंच अजित कासार, महिला तालुकाध्यक्ष मृणाल खोत, मुरुड शहराध्यक्ष संजय गुंजाळ, मुरुड शहर महिलाध्यक्षा शीतल घरत, सचिव विजय पैर, माजी सभापती बाबू नागावकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष शाम कोतवाल, माजी सरपंच मनीष नांदगावकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाई सुर्वे यांच्यासह माजी सभापती अभिषेक काते, किरण खोपकर, विघ्नेश सुर्वे, समीप आडुळकर, महेश भिसे, सेव्हन भाटकर यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेला निवडणूक सुरू होण्याअगोदरच मोठा फटका बसला असून, आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. पुढे बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, "राजकारणात संयम आणि सबुरी खूप महत्वाची आहे.
नियती सर्व हिशोब चुकते करते. भाई सुर्वे यांना पक्षात मानाचे स्थान दिले जाईल आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होईल. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मुरुड शहरात लवकरच महत्वाचे विकासकाम सुरु होणार असून, मुख्याधिकार्यांना टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही जनतेच्या सेवेत अविरत कार्य करत राहू.” भाई सुर्वे यांनी सांगितले, "मी सात वर्ष आमदार महेंद्र दळवी यांच्या सोबत होतो.
पक्षात अनेक लोक आल्यानंतर आम्हाला दुर्लक्षित केले गेले. आमदार दळवी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो, परंतु जिल्हा परिषद तिकीट देताना स्वतःच्या घरातील सदस्यांना दिले गेले. लवकरच मुरुड तालुक्यातून अनेक कार्यकर्ते पक्षात प्रवेश करणार आहेत. आमच्या रक्षणासाठी खासदार तटकरे यांच्याकडे आम्ही विनंती करतो.” सदर कार्यक्रमास तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती आणि भाई सुर्वे यांचा प्रवेश मुरुड तालुक्यातील राजकीय वातावरणात लक्षणीय बदल घडवून आणणार असल्याचे दिसून आले.