अलिबाग | वातावरणात सातत्याने होणारे बदल, हवेत वाढलेला उष्मा आणि फटाक्यांचा विषारी धूर याचा परीणाम मानवी आरोग्यावर होतो आहे. उष्णतेच्या विकारांबरोबरच फुप्फुसाचे आजार वाढत चालले आहेत. दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्री जाणवणारी थंडगार हवा यामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा तक्रारींनी डोके वर काढले आहे.
अनेक नागरिकांना ही लक्षणे आठवडाभरापेक्षा अधिक काळ जाणवत असून, त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही होतो आहे. कितीही बंदी आणली तरीही दरवर्षी दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. या फटाक्यांमुळे आवाजाच्या त्रासाबरोबरच त्यातून निघणार्या कार्बन मोनोऑक्साईड, सल्फर डायऑक्साईडसारखे अनेक विषारी पदार्थ बाहेर पडत असतात. धूरामुळे प्रदुषणात वाढ होऊन हवेचा स्तर खालावतो.
त्यामुळेच दिवाळीच्या दिवसांत अस्थमाच्या रुग्णांना धोका असतो. विषारी वायू श्वासोच्छवासावाटे फुप्फुसांपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर अॅलर्जीचे प्रकार सुरु होतात. हृदयविकाराच्या रुग्णांनाही याचा त्रास जाणवतो. सहज श्वास घेता येत नाही. सध्या श्वसनाच्या रुग्णांची संख्या सरकारी दवाखान्यांबरोबरच खाजगी रूग्णालयातदेखील वाढलेली आहे. पावसाळ्यानंतर हवामानातील बदलामुळे आता व्हायरल संसर्गांचे प्रमाण वाढले आहे.
सतत येणार्या शिंका, सर्दी-खोकला, अंगदुखी, थकवा यांसारख्या तक्रारी रुग्णांमध्ये सामान्य दिसत आहेत. पावसाळा संपला तरी संध्याकाळी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. कधी ढगाळ वातावरण तर कधी कडक ऊन पडते. यामुळे आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. ग्रामीण भागात सध्या भातकापणीची कामे सुरू आहेत. त्यासाठी शेतकरी वर्ग भल्यापहाटे घराबाहेर पडून शेतावर जातो.
ज्यावेळी शेतावर जातो तेव्हा वातावरण थंड असते; नंतर मात्र भर उन्हात त्यांची कामे सुरु असतात. त्याचा एकत्रित दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अशा रुग्णांची गर्दी होत आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि गर्भवती महिला या गटाने स्वतःला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.
पुरेशी झोप, संतुलित आहार, स्वच्छतेकडे लक्ष देणे तसेच हात धुण्याची सवय ठेवणे यावर भर देणे महत्त्वाचे आहे. अलिबाग येथील डॉ. निशिगंध आठवले यांनी सांगितले, की लक्षणे दीर्घकाळ टिकल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. औषधोपचाराचा पूर्ण कोर्स घेणे, ताप आणि अंगदुखीवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. तसेच काही वेळा व्हायरल संसर्गाची लक्षणे डेंगी किंवा मलेरियासारख्या आजारांसारखी भासू शकतात.
दम्याच्या रुग्णांनी इनहेलर, नेब्युलायझर सदैव जवळ ठेवावे. प्रवास करताना औषधेही बाळगा. रुग्णांनी दिवाळीच्या नंतर काही दिवस बाहेर पडताना अधिक काळजी घ्यावी. कारण फटाक्यांमुळे या दिवसांत आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. शक्यतो बाहेर पडताना तोंडावर मास्क लावून फिरावे. दम लागणे किंवा इतर त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. ज्ञानेश्वर अळसरे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय