कर्जत | स्वतःला जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) आणि पोलीस निरीक्षक (पीआय) असल्याचे भासवून दोघांनी कर्जतमधील अनेकांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जत भूमिपुत्र फार्महाऊस संघटनेच्या तक्रारीनंतर कर्जत पोलिसांनी अल्पावधीतच तपास करून दोघांकडून फसवणूक केलेली रक्कम परत मिळवून दिली आहे.
कर्जत तालुक्यातील एका रिसॉर्ट मालकाला काही व्यक्तींनी फोन करून ते पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी स्वतःची ओळख ‘शुभम एस.पी.’ आणि ‘समीर पी.आय.’ अशी करून, फार्मवर अल्पवयीन जोडपे आले असल्याचे आणि त्यांनी अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा बनाव रचला.
पुढे त्या प्रकाराची चौकशी सुरू असून "तुमच्यावरही अंतर्गत गुन्हा दाखल होईल, फार्म सील केला जाईल आणि अटक केली जाईल” अशा कडक पोलिसी भाषेत धमकी देऊन त्यांनी फार्महाऊस मालकांकडून "सेटलमेंट” या नावाखाली पैसे वसूल केले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांना धमकावून अनेकांकडून पैसे उकळले होते.
यामध्ये धनंजय म्हसे (वारे) यांच्याकडून १२ हजार रुपये, चेतन घुमरे यांच्याकडून १५ हजार रुपये, समीर कुडूसकर यांच्याकडून ५ हजार रुपये अशी रक्कम ऑनलाईन पद्धतीने आराध्या ज्ञानेश्वर दुधासे या खात्यावर घेतली गेली. तर जयवंत भोसले (टाटा पॉवर हाऊस) यांना देखील धमकावण्यात आले, मात्र त्यांनी पैसे दिले नाहीत.
या सर्व घटनेची माहिती भूमिपुत्र फार्महाऊस संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सहकारी बिपीन लाड आणि अनिल भोसले यांच्या मदतीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, महिला हवालदार कांबळे आणि सलोटे यांनी जलद कारवाई करत शुभम व समीर दुधासे यांना शोधून काढत कारवाई केली.