गोरेगाव | राज्यभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील गोरेगावात राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विकास दादा गायकवाड यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
विकास गायकवाड हे मागील वीस वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असून,पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नव्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने गायकवाड यांच्या या प्रवेशामुळे गोरेगावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडणार असून, हा "गेम चेंजिंग फॉर्म्युला” ठरू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्यात मंत्री भरत गोगावले, प्रमुख प्रमोद घोसाळकर, अरुण चाळके, महेंद्र मानकर, विपुल उभारे, नीलिमा घोसाळकर, जगदीश दोशी, दिनेश हरवंडकर, मंगेश कदम, विशाल टेंबे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, गोरेगावातील राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.