कर्जत । तालुक्यातील अंजप गावात विजेच्या वाहिनीचा धक्का लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, महावितरणच्या निष्काळजीमुळे केवळ चार महिन्यांत चौघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकारानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष उसळला असून, मृतदेह उचलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
अर्जुन मोरेश्वर मिणमीने (वय 38) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (13 ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ते झाडावर पाने तोडत असताना त्या झाडातून गेलेल्या विजेच्या वाहिनीचा त्यांना जबर धक्का बसून जागीच मृत्यू झाला. झाडीमधून विजेची वाहिनी गेली असल्याची कल्पना त्यांना नव्हती, त्यामुळे दुर्दैवी अपघात घडला. घटनेनंतर अंजपसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले.
महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचत नाहीत तोवर मृतदेह उचलण्यास ग्रामस्थांनी नकार दिला, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. कर्जत पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी घटनास्थळी दाखल झाले. अंजपप्रमाणेच याआधीही कळंबोली उपकेंद्र क्षेत्रात वीज वाहिन्यांच्या चुकीच्या स्थापनेमुळे तीन जणांचे बळी गेले आहेत.
काही महिन्यांपूर्वी सालवड गावातील आठ वर्षीय शिव मोहिते हा खेळताना जमिनीवर पडलेल्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने ठार झाला होता, तर बारणे गावातील आदिवासी कुटुंबातील दोन व्यक्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संताप उसळला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.