पनवेल महापालिकेचे प्रभाग जैसे थे! सूचना अन् हरकतीचे प्रारुप फेटाळले! निवडणूक आयोगाकडून अंतिम मंजुरी

By Raigad Times    13-Oct-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग प्रारूप संदर्भात घेण्यात आलेल्या २८२ हरकती आणि सूचना फेटाळण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून यासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता प्रभाग निश्चित झाले असून त्यांची हद्द ठरलेली आहे. परिणामी इच्छुकांना तयारी करण्यासाठी आता बर्‍यापैकी चित्र स्पष्ट झालेले दिसून येत आहे.
 
पनवेल महानगरपालिकेने ३ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचना काढून प्रभाग प्रारूप जाहीर केले होते. १० ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभाग रचनेसंदर्भात प्रारूप जाहीर करण्यात आले. त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नसल्यामुळे हरकतीदार यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विशेष करून खारघर मध्ये फोरमच्या माध्यमातून त्या त्या सेक्टरची हद्द फोडण्यात आल्याबद्दल आक्षेप नोंदवला होता.
 
लीना गरड, मधु पाटील, बालेश भोजने, यांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला होता. त्यांनी लेखी हरकत आणि सूचना मांडल्या असतानाही त्या निवडणूक विभागाने ग्राह्य धरल्या नाही. त्याचबरोबर कळंबोलीतील प्रभागासंदर्भातही काही प्रमाणात जोडतोड आणि तोडफोड केल्यामुळेसुद्धा हरकत घेण्यात आली होती. कामोठे येथेसुद्धा अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी हरकत मांडली होती. याशिवाय इतरांनीही निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता.
 
जिल्हाधिकार्‍यांनी आपला अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला. त्याचबरोबर महानगरपालिकेने सुद्धा सादरीकरण केले. लोकसंख्या आणि रस्त्यांचा आधार घेऊन हे प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. २०१७ च्या प्रभाग रचनेमध्ये थोडासा बदल महापालिका प्रशासनाने केला आहे.
इच्छुकांमध्ये मोठा संभ्रम!
पनवेल महानगरपालिका प्रभाग प्रारूप निश्चित करण्यात आले आहे. मात्र प्रभागाची हद्द, त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या इमारती आहेत याबाबत अचूकता येत नाही. या संदर्भात सविस्तर प्रभागाबाबत माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आमची सोसायटी कोणत्या वार्ड मध्ये येते अशा प्रकारची विचारणा मतदार करीत आहेत. या प्रभाग प्रारूपामध्ये स्पष्टता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.
लवकरच प्रभागनिहाय याद्या जाहीर होणार!
पनवेल महानगरपालिकेच्या २० प्रभागानुसार मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यावेळी कोणते मतदार कुठे आहेत? याबाबत स्पष्टता निर्माण होणार आहे. यासंदर्भात अद्यापही निवडणूक विभागाने कार्यक्रम जाहीर केलेला नाही. आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी निश्चित करण्यात येणार आहेत.