खोपोलीत ठाकरे शिवसेना अ‍ॅक्टीव्ह मोडवर , नगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु; पक्षाची आढावा बैठक संपन्न

By Raigad Times    12-Oct-2025
Total Views |
 khopoli
 
खोपोली | विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचा पराभव झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये काळजी होती की पुढील धोरण काय असेल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जाहीर होताच ठाकरे शिवसेना अ‍ॅक्टीव्ह मोडवर आली आहे. पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत सक्रीय झाले असून त्यांनी खोपोलीत बैठक घेऊन नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास सज्ज असून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार पक्षाच्या माध्यमातून देण्याची तयारी आहे. इच्छुक उमेदवारांना कामाच्या निकषानुसार उमेदवारी मिळेल; इच्छुकांनी आपला बायोडाटा निरीक्षकांकडे सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी केले. खोपोली शहर मर्यादित शिवसेना पक्षाची आढावा बैठक ९ ऑक्टोबर रोजी नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली.
 
यावेळी खोपोली शहर प्रमुख अंकुश पवाली, युवासेना अधिकारी पंकज रुपवते, पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, संघटक दिलीप पुरी, नितीन मोरे, महेश नायकोडे, प्रवक्ते विलास चालके, शहर संघटिका किशोरी शिगवण यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विधानसभा निवडणूक निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर लढली असता जनतेने भरभरून प्रेम दिले.
 
मी कमी पडलो असलो तरी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मी कमी पडणार नाही. सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम करेल’, असा विश्वास नितीन सावंत यांनी व्यक्त केला. तर "नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्या हात बळकट करण्यासाठी एकजुटीने काम करावे”असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.