नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 8 ऑक्टोबरला ! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिल्या उड्डाणाचा शुभारंभ, नियमित उड्डाणे डिसेंबरपासून

मेट्रो-3 आणि मेट्रो-2 बी प्रकल्पांचेही उद्घाटन

By Raigad Times    01-Oct-2025
Total Views |
new mumbai
 
नवी मुंबई । बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. याच कार्यक्रमात मुंबईतील मेट्रो-3 आणि मेट्रो-2 बी या मार्गांचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
 
नवी मुंबईतून विमानोड्डाण सुरू करण्यासाठी सिडको आणि ‘एनएमआयएएल’कडून मोठी लगबग सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. उद्घाटनानंतर मेट्रो-3 मार्ग बीकेसी ते कुलाबा असा 35 किमीपर्यंत धावणार आहे. तर मेट्रो-2 बी मंडाले ते डायमंड नगर यादरम्यान चार स्थानकांसह सुरू होईल. दरम्यान, एअर इंडिया समूहाने नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसची सुरुवातीला 20 उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे.
 
यामध्ये देशातील 15 शहरांसाठी थेट उड्डाणे असतील. भविष्यात ही संख्या वाढवून 55 ते 60 उड्डाणांपर्यंत नेण्याचा मानस आहे. उद्घाटनानंतर विमानतळ परिसर ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात दिला जाईल. सुरक्षा तपासणी आणि स्कॅनिंग प्रक्रिया सुमारे 45 दिवस पार पडेल. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नवी मुंबईतून नियमित व्यावसायिक विमान उड्डाणांना सुरुवात होणार आहे.